पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित जी. के. एन. (महिंद्रा सिंटर्ड) या बहुराष्ट्रीय कंपनीतील कामगारांनी १३ जुलै पासून कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध संप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या कंपनीत महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटना दिवंगत कामगार नेते कॉम्रेड दादा रुपमय चॅटर्जी यांनी स्थापन केली आहे. मागील काही वर्षांपासून व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करीत आहे त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष सदानंद टिळेकर आणि जनरल सेक्रेटरी निळकंठ मिरजगावे यांनी कामगार संपावर जाणार असल्याचे पत्र प्रसिद्धिस दिले आहे. पिंपरी चिंचवड आणि भोसरी औद्योगिक पट्ट्यात सुरुवातीच्या काळात ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या त्यामध्ये महिंद्रा सिंटर्ड या कंपनीचा समावेश आहे. अलीकडच्या काळात महिंद्रा सिंटर्ड कंपनीचे नाव बदलून जी. के. एन. करण्यात आले. या कंपनीत टीयूसीसी या कामगार संघटनेशी संलग्न महिंद्रा सिंटर्ड कामगार संघटना कार्यरत आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीत मागील काही वर्षांपासून व्यवस्थापन कामगारांची पिळवणूक करीत आहे. याविषयी कामगार संघटनेने यापूर्वी कामगार आयुक्त मुंबई, कामगार उपायुक्त पुणे आणि पिंपरी पोलीस स्टेशन यांना देखील पत्र दिले आहेत. कामगार संघटनेच्या या मागणीकडे कंपनी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.