पाच नव्हे दहा नव्हे तर चहाची फक्त तब्बल ४७ दुकाने पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या दोन चार वर्षात अवतरली असतानाच आता ‘गुळाचा चहा’ हे नाव घेऊन नावाप्रमाणेच गुळाचा चहा शनिवार पासून (ता. २०) शहरात येत आहे.
जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेल्या चहाचे आता ब्रॅन्ड व साखळी स्वरूपात सर्वत्र आगमन होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर चहा पिणे आता स्टेट सिंम्बॉल बनू पाहत आहे. पुणे शहराला ज्याप्रमाणे अमृततुल्य चहाची परंपरा आहे. तसा बाज काही पिंपरी चिंचवडला नव्हता. मात्र अलिकडे चहा विक्रीत या शहरानेही आघाडी घेतली असून चहा पिण्यात दर्दी असलेले खास वाकडी वाट करून मनपसंत व लज्जतदार चहाच्या दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत.
एखादया भव्य शोरूमला साजेशी आता चहाची दुकाने शहरातही अवतरू लागली आहेत. पूर्वी शहर फारसे वाढले नसतानाच्या काळात पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडीजवळ ‘अशोका’ नावाचे हॉटेल खास चहासाठी फेमस होते. पुण्याला जाणारा किंवा पुण्याहून येणारा या ‘अशोका’ मध्ये जन्मसिद्ध हक्क असल्यासारख्या चहा पिणेसाठी थांबे व आजही थांबतोच आहे. हॉटेल, टपरी, हातगाडीवर चहा मिळतोय परंतू तिथे फारशी मजा येत नव्हती. नंतर नंतर हॉटेल प्रशस्त झाली खरी परंतू एक चहा तिघात घेऊन सातबाराच्या गप्पा हाणण्यात ही हॉटेले फेमस झाली परंतू चहा काही फेमस होत नव्हता. २० वर्षापूर्वी पिंपरीतील आंबेडकर चौकातील रॉक्सी हॉटेल इराणी चहासाठी फेमस होते. राजकारणी, पत्रकार, कार्यकर्ते यांची या रॉक्सीमध्ये कायम ऊठबस असे. चहा घेऊन तासनतास बसून राहणारे पब्लिक पाहून या रॉक्सीवाल्याने १५ रूपयाला चहा नेऊन ठेवला तरी गर्दी काही कमी होत नव्हती. पुढे पुढे मात्र चहा विक्री बंद करून भोजनाकडे रॉक्सीवाल्याने आपला मोर्चा वळविला.
नंतर पिंपरीत नीलम, माऊली, पवनेश्वर हे पण खास चहासाठीचे अड्डे व कट्टे बनले. व तेथील चहा फेमस होऊ लागला. नंतर इराणी सारखाच फ्लेवर परंतू उकळून उकळून घट्ट केलेला चहा घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये जायका चहा अवतरला. काही वर्षातच जायकाने आपल्या शाखा शहरभर केल्या. दरम्यान पुणे जिल्हा व पुणे शहरात फेमस असलेल्या येवले चहाने पिंपरी चिंचवडचे चहा मार्केट बघून येथे पाऊल टाकले. येवले चहाची चव व स्वच्छतेचा दर्जा पाहून फ्रॅन्चायसी घेण्यासाठी व्यावसायिकांच्या उडया पडू लागल्या. बक्कळ कमाई चहात असल्याचे पाहून मग साईबा, प्रेमाचा चहा अशी साखळी दुकाने शहरात येऊ लागली.
आता लवकरच गुळाचा चहा या ब्रॅन्डचा खास कोल्हापूरी गुळ टाकून बनविलेला चहा चिंचवड स्टेशन परिसरात येतोय. या चहाचा ब्रॅन्ड ॲम्बेसिडर आहे मुंगळा. किटक वर्गात मोडणारा मुंगळा हा कायम गुळाच्या ढेपेला चिकटलेला असतो त्यामुळेच या गुळाच्या चहाला यामंडळींनी ब्रॅन्ड ॲम्बेसिडर केले आहे. चहाच्या उद्योगातही कार्पोरेट कल्चर आणण्याचा प्रयत्न या गुळाच्या चहाचे मालक श्रीधर पाटील यांनी केला आहे.
आजही आपल्या संस्कृतीत घरी आल्यावर पहिला चहा विचारला जातो. तर रस्त्यात परिचित भेटला की ‘चला चहा घेऊ’ म्हटले जाते. चहा किती आरोग्यदायी किंवा उर्जा देणारा की शरीर नासवणारा हे ज्याच्या त्याच्या पिण्यावर व कल्पनेवर अवलंबून असले तरी चहाच्या या मार्केटने शहराला मात्र पक्का विळखा घातला आहे. अजून काही दिवसांनी तर पाहुणे यायचे म्हटल्यावर ‘त्या अमूक अमूक चहाच्या ठिकाणी या’ असे म्हणून पाहुण्याला परस्पर कटविण्याचे दिवस फार दूर नाही असेच म्हणावे लागेल.