ज्या जिल्हयाचे म्हणून शरद पवार यांचा संपूर्ण देशात दबदबा आहे त्याच जिल्हयातील शिरूर लोकसभेच्या जागेवर सलग पंधरा वर्षे आपटी खावी लागत असल्याची जखम राष्ट्रवादी काँग्रेसला सतत ठसायची. मागील तीन निवडणूकीत मनी व मसल पॉवर असलेले उमेदवार देऊनही येथून डाळ शिजत नसल्याने अखेर यंदा डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारखा लोकप्रिय चेहरा राष्ट्रवादीला लाभल्याने त्यांचा जीव भांडयात पडला आहे. शिरूर लोकसभेसाठी डॉ. कोल्हे यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादीने निश्चित केले असले तरी दोन उमेदवारांच्या जीवनपद्धतीत असलेल्या मुलभूत फरकामुळे कोण बाजी मारणार? याच्या चर्चा व गप्पांना चावडीवर तसेच पारावर प्रचंड ऊत आला असल्याचे चित्र आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा व नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. १९८९ ला जनता दलाचे किसनराव बाणखेले यांनी येथून मिळविलेला विजयाचा अपवाद वगळता हा मतदारसंघ कायम काँग्रेसच्या पाठिशी राहिलेला आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ मध्ये या मतदारसंघाची सूत्रे त्यांच्या ताब्यात आली आणि अशोक मोहोळ १९९९ ला येथून खासदार झाले. पुढे मात्र २००४, २००९ आणि २०१४ अशी सलग तीन वेळा शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी येथून विजयाची हॅट्रीक मारली. अशोक मोहोळ, देवदत्त निकम, विलास लांडे असे तीन वेगवेगळे चेहरे राष्ट्रवादीने येथे देऊन पाहिले. २००४ ला खेड लोकसभा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख होती तर २००९ ला शिरूर लोकसभा असे नामकरण होऊन पूर्नरचना होत भोसरी व हडपसर जोडली जाऊन हा मतदारसंघ अस्तित्वात आला.
दांडगा जनसंपर्क, जनतेच्या सुखदु:खामध्ये सहभागी होण्याची वृत्ती आणि जनतेला जवळची वाटेल अशी जीवनपद्धती ही आढळराव यांची बलस्थाने होती व आजही आहेत. सारखा पराभव होत असल्याने उद्वीग्न होऊन् काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मी स्वत: येथून लढेल असे जाहीर वक्तव्य केले होते. मात्र शरद पवार यांनी नंतर आमच्याकडे चांगले चेहरे असल्याची माहिती देऊन अजितदादांनी येथून लढण्याची आवश्यकता नाही असे म्हणत पूर्णविराम दिला.

चारच दिवसांपूर्वी शिवसेनेचे डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत प्रवेश करून मोकळे झाले. एव्हाना विलास लांडे यांनी जाहिराती, होर्डिंग्जच्या माध्यमातून बऱ्यापैकी अंतर गाठले होते. परंतू कोल्हे आल्यामुळे राष्ट्रवादीने आता सुस्कारा सोडला आहे.
मूळचे जुन्नरचे परंतू कार्यक्षेत्र मुंबई असलेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख होते. नितीन देसाई यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतून त्यांचा चेहरा घराघरात पोहोचला. कलावंत, फर्डे वक्ते व सेलिब्रेटी यांना कळपात ओढण्याचा छंद असलेल्या सेनेने त्यांना थेट संपर्कप्रमुख नेमले. लादलेले नेतृत्व व निवडून आलेले नेतृत्व ही शिवसेनेत कायम दरी ठरत आली आहे. शिवसेनेत असले तरी ते पंचतारांकित संस्कृतीत होते. २०१७ च्या पुणे व पिंपरी महापालिकेत सेनेचा सुपडा साफ झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देत शिवसेनेतून जवळजवळ अंग काढून घेतलं होतं.
दरम्यान त्यांची संभाजी महाराजांवर मालिका आली, ती प्रचंड लोकप्रिय ठरली आणि शिवाजी महाराज व संभाजी महाराज अशी दोन्ही रूपे जनता त्यांच्यामध्ये पाहू लागली. याच संधीचा फायदा घेऊन राष्ट्रवादीने त्यांना आपल्या कळपात ओढले. व आता शिरूरमधून त्यांना उभे करण्याची रणनिती आखली आहे.
कोल्हे यांचे ओबीसी (माळी) असणे व जुन्नर, आंबेगाव खेड, हडपसर येथे या समाजाचे असलेले प्राबल्य, जोडीला राष्ट्रवादीची ताकद, दलित व मुस्लिमांची आघाडीकडे झुकलेली मानसिकता व कोल्हे कोण? हे जनतेला सांगावे लागणार नसल्याची पाळी असा एकत्रित गणिताचा कालवा राष्ट्रवादीने आता तयार केला आहे.
नट असणे, लोकांना माहित असणे व निवडून येणे यामध्ये मोठा फरक असल्याचे उत्तर आढळराव समर्थक ठिक ठिकाणी देताना आढळतात. बशीत व पितळीत चहा पिणे, दहावे, तेरावे, मैती, लग्नं, फूफाटयात फिरणं, कुठंही बसणं, वावराची – पिकपाण्याची माहिती असणं, आदी साऱ्या गोष्टी डॉ. कोल्हे यांच्या व्यक्तिमत्वाच्या पूर्ण विरोधातील आहे. त्यात ते बदल करतीलही..! सारा खेळ जातीय गणिते, स्ट्राँग कार्यकर्ते, व मतदारसंघातील बलाढय आमदार यांच्या समीकरणावर अवलंबून असणार आहे. परंतू इतिहास असा सांगतो की, निवडणूक कुठलीही असो नट अथवा नटी दिली की यश हमखास मिळतंच…! अमिताभ बच्चन, हेमामालिनी, धर्मेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, सुनिल दत्त, गोविंदा ते स्मृती इराणी, किरण खैर आदींच्या विजयामुळे सिद्ध झालं आहे. भावना, बदल आणि वेगळी कृती ही तीन रसायने हमखास मतदारराज्याच्या मेंदूत चक्राकार फिरत असतात.
परंतू अभिनय करणं आणि राजकारणं खेळणं या प्रचंड भिन्न गोष्टी आहेत. लाट असो वा नसो तसेच कुणीही उमेदवार दिला तरी जनमाणसाची नाळ शिवाजीराव आढळराव यांनी आपल्याशी जोडून घेतली आहे. तर मंगळवारी ५ मार्च रोजी राष्ट्रवादीने भोसरीत यानिमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करून गर्जना केली आहे. एकूणच जिल्हयात ही लढत आताच प्रचंड लक्षवेधी ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.