( विजय जगताप)
हल्ली पाप-पुण्याचा हिशोब याच जन्मात व तो देखील दहा-वीस वर्षातच चुकता करावा लागत असल्याचे चित्र सर्वत्र आढळते. सदैव अस्थिर म्हटल्या जाणाऱ्या राजकारणा सारख्या क्षेत्राचा देखील त्यामध्ये समावेश होतो. या उदाहरणाची प्रचिती परवा पिंपरी चिंचवड मध्ये पहावयास मिळाली. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुभेदारांचे सरदार अशी ओळख असलेल्या अजित दादा पवार यांना “जे पेरलं तेच उगवलं” या म्हणीचा साक्षात्कार भाऊसाहेब भोईर यांनी घडवून दाखवला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले व महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ हमखास भाजपला जाणार.. हे निर्विवाद सत्य असतानाही अजितदादांचे खंदे समर्थक भोईर यांनी बंडखोरीचे हत्यार उपसून महानिर्धार मेळावा घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांची तयारी व उभारलेली यंत्रणा पाहता, साक्षात ब्रह्मदेव आला तरी ते माघार घेतील असे वाटत नाही. वर उल्लेख केलेल्या “जसे पेराल तसेच उगवते” या म्हणीचा अर्थ अजितदादांपुरता बोलायचा झाला तर पाठीमागील २००९ च्या निवडणुकीमध्ये त्याचे संदर्भ दडले आहेत. थोडं अजून मागे जाता कॉग्रेस आणि राष्ट्रवादी हा आघाडी धर्म असतानाही २००४ च्या विधानपरिषद निवडणुकीत (स्थानिक स्वराज्य संस्था) काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार चंदूकाका जगताप यांना पाडण्यासाठी अजित दादांनी स्व. लक्ष्मण जगताप यांना छुपी ताकद दिली आणि महाराष्ट्राच्या राजकीय पडद्यावर जगताप यांचं आगमन घडवून आणलं. (पुढे याच जगतापांनी अजितदादांच्या पिंपरी चिंचवड मधील सत्ता वर्चस्वाला सुरुंग लावला, तो भाग निराळा.) असो, पुढे काँग्रेसची अजून जिरवण्यासाठी याच अजितदादांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड मतदार संघ काँग्रेसला सुटला असतानाही पुन्हा लक्ष्मण जगताप यांनाच छुपं बळ दिले. विशेष म्हणजे याच निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले भाऊसाहेब भोईर यांचा दारुण पराभव अजित दादांनी तेव्हा घडवून आणला होता. झालं गेलं विसरून जाऊन भाऊसाहेबांनी कालांतराने पुढे अजितदादांच्या पंखाखाली आसरा घेतला. राजकारणात सतत येणाऱ्या अपयशाची वेदना भाऊसाहेबांनी मग सांस्कृतिक माध्यमातून भरून काढली असली तरी, म्हणतात ना वर्दीची ताकद ती वर्दीचीच…! भाऊसाहेबांपेक्षा ज्युनियर पोरं -आमदार खासदार होऊ लागल्याने भाऊसाहेब अस्वस्थ होणं साहजिकच होतं. भाऊसाहेब हे महाराष्ट्राच्या साहित्य-संगीत-कला- नाटय या सांस्कृतिक मंचावर खुद्द या खात्याच्या मंत्र्यापेक्षा ही भले मोठे झाले असले तरी जी मजा आमदार असण्यात व खासदार असण्यात आहे, ती या सांस्कृतिक विश्वात नसणं हे वास्तव होतं. आज उघडपणे थेट महायुती धर्माच्या व सौजन्य तसेच सौहार्द या राजकारणातील नामधारी शब्दाच्या पेकटात लाथ मारून भाऊसाहेबांनी आपल्या या वस्तादालाच डाव दाखविला आहे.
भाऊसाहेब आजच्या घडीला नक्कीच ताकदवर अपक्ष उमेदवार आहेत. मात्र धोक्याची घंटा म्हणजे २००९ पासून झालेल्या आतापर्यंतच्या चार निवडणूकीत नेहमी विरोधकांच्या मत विभागणीत भाजपचाच विजय येथून होत आलाय. भाऊसाहेबांच्या या निर्णयामुळे भाजपच्या अंगणात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. भाऊसाहेब अपक्ष लढणं हा अप्रत्यक्षरित्या भाजपचा लाभ आहे, असं आजचं तरी गणित आहे, आगामी दिवसात भाऊसाहेब किती पल्ला गाठणार हा अभ्यासाचा विषय आहे. हा मतदारसंघ प्रचंड मोठा आहे, अपक्ष लढणं वाटतं तेवढं सोपं देखील नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उद्धव सेना किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी यापैकी ज्याच्या वाटयाला ही जागा जाईल, त्यांना आपला उमेदवार देताना फार काळजी घ्यावी लागणार आहे. एक तर भाऊसाहेबांना तिकीट देऊन किंवा त्यांच्याशिवाय भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लढावं लागणार आहे. कारण भाऊसाहेबांची ताकद शेवटी महाविकास आघाडीच्या मतांनाच मोठ्या प्रमाणात पोखरणार आहे, हे कटू सत्य आहे. असं असलं तरी जर भाजपला चिंचवडमधून हद्दपार करायचंच असेल तर जगताप घराण्याविरोधी मोहिमेच्या विरोधात एकत्र आलेल्या व पुढेही सामिल होणाऱ्या मंडळींनी महाविकास आघाडीला बळ देण्याशिवाय पर्याय नाही. अजितदादांनी सरड्याला डायनासोर बनवला, हे भाऊसाहेबांचे वाक्य टाळ्या घ्यायला, चिंतन करायला, व ज्या मंडळींना उद्देशून वापरले आहे अशा सगळ्यानांच विचार करायला लावणारे आहे. मग प्रश्न येतो की, डायनासोर सगळं जंगल सपाट करत असताना भाऊसाहेब का शांत होते? असो, काही गोष्टींची वेळ यावी लागते, आज वेळ आली आहे आणि म्हणून भाऊसाहेबांचा यल्गार कोंडलेल्या वाफेतून त्वेषाने बाहेर पडतो आहे.