(विजय जगताप)
पिंपरी-चिंचवडचा स्वातंत्र्यलढ्याशी व स्वातंत्र्यपूर्व आंदोलनामध्ये सहभाग असल्याच्या अनेक घटना इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत. यापैकी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे आजपासून बरोबर ऐंशी वर्षांपूर्वी (९ऑगस्ट १९४२) रोजी चिंचवड रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी यांचे पाय लागले होते.
या घटनेमागची पार्श्वभूमी अशी की, ८ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे महात्मा गांधी यांनी “चले जाव” हा चळवळीचा इशारा ब्रिटिशांना दिला. आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभरातून आंदोलनाला सुरुवात झाली. ब्रिटिश प्रशासन( इंग्रज) हादरले. संपूर्ण देशातील नागरिक पेटून उठल्याने इंग्रजांनी या आंदोलनाची व्याप्ती वाढू नये, म्हणून गांधीजींना मुंबईतच अटक केली. वातावरण स्थिर होईपर्यंत गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्याचा निर्णय इंग्रज पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला. ८ ऑगस्टच्या रात्री साडेआठ वाजता मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका पॅसेंजर गाडीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत गांधीजींना बसवण्यात आले. गांधीजींना अटक केली असून पुण्यात आणले जाणार ….ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. मग स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पेटून उठलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे स्टेशनवर इंग्रजांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी व निषेध करण्याची तयारी सुरू केली. पुण्यात गर्दी होऊन गडबड होऊ शकते, याची चाहूल इंग्रज पोलिस अधिकाऱ्यांना लागली, मग आपल्या प्लॅनमध्ये बदल करत पहाटे ५ वाजून १३ मिनिटांनी पॅसेंजर गाडी चिंचवड रेल्वे स्थानकावर येताच गांधीजींना तिथे उतरवण्यात आले. अनपेक्षित पणे गांधीजी चिंचवडला उतरलेले पाहून मोजक्या कार्यकर्त्यांना त्यांचे दर्शन झाले. चिंचवड रेल्वे स्थानक ते पुणे मुंबई महामार्ग या तीन
मिनिटांचे अंतरामध्ये खाण परिसर असल्याने मोठमोठे दगड होते.व बैलगाडी जाईल इतकीच कच्ची वाट होती. चालत चालत गांधीजींना महामार्गावर आणल्यानंतर तिथून एका मोटारीत बसून पुण्याकडे नेण्यात आले. या प्रसंगाची आठवण म्हणून रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवरील मोठ्या घड्याळा शेजारी ” या स्थानकावर महात्मा गांधीजींचे पाय लागले होते “अशी आठवण असलेला बोर्ड लावला होता. मागील काही वर्षापर्यंत हा बोर्ड येथे होता. नंतर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करताना हा बोर्ड काढून टाकण्यात आला.
दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना हा बोर्ड पुन्हा लावण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आज चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार व पत्रकार विजय जगताप यांनी आज चिंचवडचे स्टेशन मास्तर एन. जी. नायर यांना आज दिले.