(विजय जगताप)
राज्यसभा निवडणुकीत मिळविलेला ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीने आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांना समर्पित केल्याने या घटनेची विशेष नोंद दिल्लीतही घेण्यात आली आहे.
पायोनियर,तसेच हिंदुस्तान टाइम्स या दिल्लीतील सर्वाधिक लोकप्रिय वृत्तपत्रात याविषयीचे सविस्तर वृत्त आज छापण्यात आले आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी तिसरा उमेदवार लढविण्याचे बळ कागदावर दिसत असताना देखील भाजपने महाडिक यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडीला आव्हान दिले. प्रारंभी महाविकास आघाडीच्या मार्गात नेहमी प्रमाणेच अडथळा आणण्याचा हा प्रकार सर्वांना वाटत होता.
वास्तविक ही चाल समजायला महाविकास आघाडीच्या नेत्यांना फार उशीर झाला होता. अक्षरशः एक एक मत महत्त्वाचे असतानाच्या या प्रसंगात मरणाच्या दाढेतून नुकतेच परत आलेले व आता सक्तीची विश्रांती घेत असलेले लक्ष्मण जगताप तसेच गंभीर आजारी असलेल्या मुक्ता टिळक या दोन आमदारांनी लोकशाहीतील कर्तव्य पार पाडत मतदानाला येऊन भाजपच्या या ऐतिहासिक विजयाला ‘चार चाँद’ लावले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मिळालेले हे यश या दोघांना समर्पित केल्याची बातमी देशभर पसरली त्याची विस्तृत माहिती दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी घेतलीच शिवाय दिल्लीतील वृत्तपत्रांनीही या दोन आमदारांचे टीव्हीवरील फुटेज पाहून याविषयीचे आज वृत्त दिले आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तर आपल्या ट्विटरवर आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रशंसा केली आहे तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही भाजपच्या दोन आमदारांचा उल्लेख आज आपल्या प्रसिद्धीपत्रकात (राष्ट्रीय बुलेटिन) केला आहे.