पिंपरी चिंचवड शहराच्या संस्कृतीमध्ये किर्तन, तमाशा आणि कुस्ती यांचा दोनशे वर्षांचा इतिहास दडला असून, लोप पावत चाललेले हे बीजधन पेरण्याचे काम नव्या पिढीने करावे, अशी भावना संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे यांनी आज येथे व्यक्त केले.
‘पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशन’, महाराष्ट्र या सांस्कृतिक व सामाजिक संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा दिमाखदार सोहळा शुक्रवारी पार पडला.
‘ साहित्य, संगीत, कला, क्रीडा आणि संस्कृतीची पताका फडकवत शहराच्या सांस्कृतिक वैभवाची पालखी पुढे नेण्याची कामगिरी या फाऊंडेशनच्या माध्यमातून होईल ‘ असा विश्वास विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
मंगेशकर घराण्यातील प्रसिद्ध पार्श्वगायिका राधा मंगेशकर, पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील, खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर , शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे , माजी नगरसेवक शंकर जगताप , वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण ह.भ.प. रंगनाथ नाईकडे, ह.भ.प. पुरुषोत्तममहाराज पाटील , डॉ. नंदकिशोर कपोते ह.भ.प. पांडुरंगआप्पा दातार , डॉ. रवींद्र घांगुर्डे, डाॅ. अमरसिंह निकम , ॲड. अनिल म्हाळसकर , कुंदा भिसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर व मराठी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास कलाप्रेमी रसिकांनी अलोट गर्दी केली होती.
फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. फाऊंडेशनच्या कलात्मक बोधचिन्हाचे अनावरण राधा मंगेशकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी नृत्य, वादन, गायन, लेखन तथा सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. नंदकिशोर कपोते, दत्तोबा पाचंगे, पांडुरंगआप्पा दातार, सुरंजन खंडाळकर , विजय जगताप , स्नेहल पोफळे व सुखदा योगी यांचाही विशेष सन्मान पार पडला.
आपल्या भाषणात डाॅ. देखणे यांनी पुढे म्हटले की, या शहराच्या विकासामध्ये औद्योगिकरणाचा पाया रचला गेल्यानंतर अनेक बहुभाषिक लोकांनी या शहराचं नाव व संस्कृती वाढविण्यामध्ये पुढाकार घेत त्याचे स्वामित्व स्विकारल्याची बाब अधोरेखित केली.
आयुक्त राजेश पाटील यांनी, ही संस्था शहराच्या सांस्कृतिक वारसाचे व इतिहासाचे जतन करील अशी भावना प्रकट केली. खासदार बारणे, भाऊसाहेब भोईर, नाईकडे, पुरुषोत्तममहाराज पाटील आदींची यावेळी भाषणे झाली.
फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाऊंडेशनचे सचिव ह.भ.प. विजय बोत्रे (पाटील) यांनी तर संतोष घुले यांनी आभार मानले.
कार्यक्रमानंतर राधा मंगेशकर यांच्या गीत संगीत मैफिलाचा कार्यक्रम पडला.