( विजय जगताप)
जिल्ह्यात सर्वात मोठा असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात यंदा महायुती मधल्याच दोन पक्षांच्या इच्छुकांची मांदियाळी झाली आहे. सगळ्यांनीच दंड थोपटले असून ‘आता नाय तर कधीच नाय’ अशा ईर्षेने सगळेच पेटून उठले असल्याचे चित्र आहे.
२००९ साली विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या पुनर्रचनेमध्ये पिंपरी चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. २००९ पासून आतापर्यंत चार निवडणुका (एक पोटनिवडणूक) होऊन ‘जगताप’ या नावाचं वलय व दबदबा सलगपणे आमदार म्हणून येथे कायम आहे. आणि नेमके इच्छुकांची यंदा संख्या वाढण्यामागे हीच खंत व वेदना देखील आहे. वास्तविक गोळा बेरीज केली तर विधानपरिषद आमदार म्हणून २००४ पासून या शहरावर स्व.लक्ष्मण जगताप यांनी जी पकड ठेवली होती ती विजयाचे रूपाने अदयाप पर्यंत कायम असली तरी मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे मत विभागणी होऊन निसटलेला विजय कसाबसा या घराण्यातील अश्विनीताई जगताप यांना मिळवता आला, हे वास्तव नाकारता येत नाही.
आगामी निवडणुकीत विद्यमान आमदारांचे दीर व शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी मागील सहा महिन्यांपासून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे श्रद्धांजली वाहण्यासाठी मागील महिन्यात शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निम्मी फौज नागपूरला विमानाने नेऊन त्यांनी बारशात मुंज उरकून टाकावी, त्याप्रमाणे सांत्वन कार्यक्रमातही आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांनी पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी आक्रमक हालचाली केलेल्या नसल्या तरी पक्षश्रेष्ठींचा आदेश ” सर आँखो पर” या उक्तीप्रमाणे त्यांनीही तयारी ठेवली आहे.भाजपचेच या भागातील माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते व शत्रुघ्न काटे यांनी शंकर जगताप यांच्या मार्गात स्पीड ब्रेकर निर्माण व्हावा या रितीने आपल्या गाड्या रस्त्यात (अर्थात आमदारकी लढण्याच्या तयारीत) आणून ठेवल्या आहेत. शंकर जगताप यांना उमेदवारी नको, का नको तर २२ वर्षे एकाच घरात आमदारकी आलेली असून इतरांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का ?असा नखाते व काटे यांचा युक्तिवाद आहे, व तो पटणारा देखील आहे. निवडून येण्याची क्षमता यासाठी जो पॅरामीटर म्हणजेच निकष तपासला जातो, त्यामध्ये शत्रुघ्न काटे व नखाते दोघंही मजबूत आहेत. “विकासाचे नाते” अशी कॅचलाईन घेऊन फिरत असलेले नखाते व पात्रता असूनही “मोठा होईल ..” म्हणून महापौर, स्थायी समिती अध्यक्ष ही पदं स्व. लक्ष्मण जगताप यांनी आपणास तेव्हा न दिल्याची वेदना काटे यांना अस्वस्थ करत आहे.
शंकर जगताप यांचे शहर भाजपा अध्यक्षपदाचे नेतृत्व मानायला मागील तेरा महिन्यांपासून काटे व नखाते खुलेआम तयार नाहीत. काही अस्वस्थ आत्म्यांना शांत करण्यात जगताप यांनी बऱ्यापैकी पॅचअप केले असले तरी खुलेआमपणे व छुप्या पद्धतीने त्यांच्या उमेदवारीला विरोध शेवटपर्यंत राहण्याची चिन्हे आहेत. भाजपमध्ये पक्षाचा आदेश प्रमाण मानला जात असल्याने शंकर जगताप निर्धास्त आहेत, परंतु सावध हि तितकेच आहेत .
महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश झाल्याने हातातोंडचा घास तिसऱ्यांदा हुकतो की काय? या चिंतेने नाना काटे यांना ग्रासले आहे. कारण चिंचवडचा विद्यमान आमदार भाजपचा असल्याने महायुतीचे तिकीट भाजपलाच जाणार, हे निर्विवाद सत्य आहे. मागील वर्षी पोटनिवडणुकीत लाखभर मते घेतलेले नाना काटे आता जनतेच्या दरबारात पत्ररूपाने ” माझं चुकलं तरी काय?” अशी वेदना घेऊन गेले आहेत. नाना काटे देखील मित्र पक्षांसाठी थांबण्यास बिलकुल तयार नाहीत. राष्ट्रवादी दादा गटाचेच माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा पॅटर्न नेहमीच वेगळा असतो. कुठे जोर द्यायचा, आणि “सबसे बडा रुपय्या” या गाण्याची धून कुठे वाजवायची, यामध्ये ते वाकबगार आहेत. तर आपल्या राजकीय आयुष्यात काल-परवाची पोरं आमदार, खासदार झाल्याची वेदना व ठसठस राष्ट्रवादी अजित दादा गटाच्याच भाऊसाहेब भोईर यांना सतावत आहे. लोकसभेत यशस्वी झालेला “सांगली पॅटर्न” हा रोल मॉडेल त्यांच्यासमोर आहे, भाऊसाहेब भोईर यांचा युएसपी म्हणजे राजकारणापलीकडे स्नेह जपणारा माणूस अशी आहे. संगीत, नाट्य, कला या सांस्कृतिक विश्वात आपल्या नावाचं निर्माण केलेलं त्यांचं राज्यव्यापी वलय हे भाऊसाहेबांचे बलस्थान आहे. एकूणच यंदा कोणीच वेटिंग करण्याला तयार नाहीत. साडेसहा लाख मतदार असलेल्या चिंचवड मध्ये निम्मं मतदान होईल असे गृहीत धरलं व लढणाऱ्या सगळ्यांच्या मतांची बेरीज करता जिंकून येण्यासाठी किमान दीड लाख मतांची ताकद ज्याच्याकडे असेल तो आमदार होणार, यात काही शंका नाही त्यामुळे “मी दीड लाख मतांची तयारी ठेवली आहे” असा ज्याला विश्वास आहे ,तोच विधिमंडळात जाणार आहे.