विजय जगताप
तरूण वयात मित्रांच्या मदतीने व्यवसाय-धंदयात स्थिरतेकडे प्रवास केलेले व प्रसंगी मैत्रीसाठी आपले राजकीय आयुष्यही पणाला लावण्याची जिगर असलेले श्रीरंग बारणे हे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व..! आप्पा या नावाने परिचित असलेल्या बारणे यांचा राजकीय प्रवास खाचखळग्यांनी भरलेला आहे. शिवसेना पक्षात २००९ ला आलेल्या आप्पा बारणे यांनी विधानसभा व नंतर २०१४ ला लोकसभा लढवून पिंपरी चिंचवड शहरात सेनेला आपल्या नावाने व वलयाने बळकटी मिळवून दिली आहे. आज त्यांचा वाढदिवस. बातमी खास टिमच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
पिंपरी चिंचवड हा बहुभाषिक परिसर…! या भागात शिवसेनेला मानणारा व निष्ठावंत म्हणता येतील अशी सुमारे २ लाख मतांची ताकद असलेला पक्षाचा हक्काचा मतदार वास्तव्यास आहे. महापालिका निवडणूक असो की विधानसभा की लोकसभेची निवडणूक सेनेच्या पारडयात मतांची श्रेणी आजपर्यंत नेहमी चढ-उताराची ठरली आहे.
ऑक्टोबर २००९ ला विधानसभा निवडणूकीच्या काही महिने अगोदर श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खंगलेली काँग्रेस व उभरता काळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या गडात शिवसेनेला बारणे यांच्या रूपाने मोठी उभारी आणि हुरूप आला. वास्तविक एप्रिल २००९ मध्येच मावळ व शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघात तेव्हा शिवसेनेचे गजानन बाबर व शिवाजीराव आढळराव पाटील या दोन खासदारांनी जिल्हयाच्या राजकीय गडाला सेनेची तटबंदी घातली होती. बारणे यांच्या रूपाने सेनेची ताकद एक बलाढय स्थानिक नेता लाभल्याने बळ निर्माण करणारी ठरली.
एव्हाना विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झालेली असल्याने नव्याने अस्तित्वात आलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सेना-भाजपची उमेदवारी बारणे यांना मिळाली. या निवडणूकीत ७२ हजार १६६ मते बारणे यांना मिळाली खरी मात्र अवघ्या साडेसहा हजार मतांनी त्यांना अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. विधानसभेचा मार्ग हुकला तरी जिद्दीने व चिकाटीने पक्ष बळकटीला बारणे यांनी प्राधान्य देत सेना नेत्यांच्या हृदयात व विशेषत: मातोश्रीमध्ये आपले वजन निर्माण केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विशेष मर्जीत स्थान मिळविलेल्या बारणे यांच्यासाठी पक्षाचा विद्यमान खासदार असतानाही सेनेने २०१४ मध्ये मावळ लोकसभेसाठी बारणे यांना उमेदवारी दिली. अपेक्षेप्रमाणे बारणे हे भाजपच्या मदतीने विक्रमी मतांनी निवडून आले. शिवसेनेला एक डॅशिंग, अभ्यासू, स्थानिक गाववाला खासदार लाभला. २००९ प्रमाणेच लोकसभेलाही बारणे यांचा सामना पुन्हा लक्ष्मण जगताप या शेकापच्या उमेदवाराबरोबर झाला होता.
मागील पराभवाची परतफेड बारणेंनी केली होती. खासदार झाल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासूनच मतदारसंघातील प्रश्न असो, शून्य प्रहर असो, प्रश्नोत्तरांचा काळ असो की अर्थसंकल्पावरील चर्चा असो आपला ठसा पाच वर्षात उमटवून बारणे यांनी संसदरत्न हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सलग पाच वेळा मिळवून विक्रम केला.
एक ठशीव कामगिरी लोकसभेत आप्पा बारणे यांनी उमटविली असली तरी २०१७ च्या पिंपरी महापालिका निवडणूकीत बारणे यांना चहू-बाजुंनी घेराव घालत लक्ष्मण जगताप यांनी पुन्हा सेनेची धूळधाण उडविली. विशेषत: थेरगाव या बारणेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले.
पालिका निवडणूकीतील पराभवाचे शल्य बारणे यांना लागले असले तरी त्यांनी हार न पत्करता शिवसेनेची संघटनात्मक धूरा हाती घेऊन २०१९ ला पुन्हा ‘मावळचा खासदार मीच होणार’ असे आव्हान दिले आहे. सद्यस्थितीत सेना – भाजपची युती होवो न होवो आपण कोणाशीही लढण्यास तयार असल्याची गर्जना बारणे यांनी करून आपली जिगरबाज प्रतिमा निर्माण करण्यास शड्डु ठोकले आहे.
पिंपरीची जागा सेनेने खेचून आणली
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या आप्पा बारणे यांनी स्थायी समिती सभापतीपद मिळवून आपल्या डॅशिंग नेतृत्वाची प्रचिती करून दिली होती. ज्या ज्या वेळीस प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते त्या त्या वेळी आव्हानाशी मुकाबला करण्यास बारणे समर्थ ठरत गेलेत असा इतिहास आहे. शहरातील राजकीय वर्चस्ववादाच्या लढाईत बारणे सध्या पिछाडीवर असले तरी शहरात पिंपरी विधानसभेमधून गौतम चाबुकस्वार यांना आमदार करून पक्षसंघटनेला उभारी देत भाजपमय झालेले हे शहर बाणांनी घायाळ करण्यास सुरूवात केली आहे. श्री. बारणे हे मावळवीर ठरले असले तरी, त्यांना घेरण्यास भाजपने अलिकडील काही दिवसात मोठी मोहिम हाती घेतली आहे. आपल्या कामांच्या बळावर विशेषत: क्रांतीवीर चाफेकर यांचे टपाल तिकीट काढणे, पिंपरी चिंचवड शहरात पासपोर्ट ऑफिस आणणे, मावळ मधील गड किल्ले व लेण्यांच्या विकासासाठी कृतीबद्ध कार्यक्रम आखणे आदी लक्षवेधी कामगिरी त्यांनी केली आहे. पुणे जिल्हयात विशेषत: मावळ मध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपचाच खासदार आणण्यासाठी होत असलेली व्यूहरचना उलटून टाकण्यासाठी बारणे विस्कळीत झालेली सेना घेवून कसे लढतात व आव्हान देतात हे पाहणे औत्सुक्क्याचे ठरणार आहे.