बाळासाहेबांना पाहिलंय असं सांगणारे या शहरात शेकडो आहेत, परंतु खुद्द बाळासाहेबांनी ज्यांना मातोश्रीवर बोलावून आशीर्वाद देत व प्रेमाने पेढा भरवलेले एकमेव शिवसैनिक म्हणजे दिलीप मामा सावंत. शिवसैनिक हीच सन्मानाची पदवी असल्याची जाणीव आयुष्यभर जपलेल्या दिलीप मामा यांची आज एकसष्ठी.
पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेचा झेंडा डौलाने फडकावण्याची व बाळासाहेबांचे विचार, प्रेरणा व ताकद हीच शिदोरी समजत कार्य करत असलेल्या दिलीप सावंत यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज एकत्र येऊन त्यांच्या एकसष्ठी समारंभाचे विशेष आयोजन भोसरी येथील गोविंद गार्डन मंगल कार्यालयात आज (शुक्रवार १५ सप्टेंबर)रोजी केले आहे.
इतर राजकीय पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणंआणि शिवसेनेत कार्यकर्ता म्हणून काम करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. शिवसैनिक होणं म्हणजे सळसळत्या रक्तामध्ये चैतन्याचा झरा अखंड पाझरत ठेवणे होय. हे सळसळते चैतन्य समाजाच्या उपयोगी तसेच गोरगरिबांच्या सेवेसाठी, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्यासाठी खर्च करणे हेच कट्टर शिवसैनिकाचं लक्षण व भावना असते. आणि हीच भावना जपण्याचं काम दिलीप मामा सावंत गेली चाळीस वर्षे करत आलेले आहेत.
नोकरी, प्रपंच सांभाळून आपल्या नेत्याला अर्थात धर्मवीर आनंद दिघे यांना भेटणं व पाहणं यासाठी दर आठवड्याला पिंपरी चिंचवड हून मुंबई वारी करणारे दिलीप सावंत यांच्या सारखी निष्ठा व प्रेम नव्या पिढीतील क्वचितच एखाद्या कार्यकर्त्यांमध्ये असू शकेल. शिवसेनेत का काम करायचं ?आणि कशासाठी? असा विचारही मनाला न शिवणाऱ्या पिढीचे नेतृत्व दिलीपरावांनी केले. शिवसैनिक होत झपाटून जाणं आणि आपल्या नेत्याच्या आदेशाचे पालन करणे हे दाखवून देणारं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हाचं देता येईल.
बरेच महिने शिवसैनिकांना घाबरून भूमिगत राहिलेले भुजबळ यांनी अखेर पुण्यातील बालगंधर्व येथील जाहीर कार्यक्रमात भाग घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर गनिमी कावा करून भुजबळांवर हल्ला करण्यात आघाडीवर असलेल्या दिलीपरावांनी शेकडो पोलिसांना न जुमानता एका पोलिसाची तर थेट बंदूक हिसकावून घेत, “खुशाल गोळ्या घाला,परंतु बाळासाहेबांशी गद्दारी करणाऱ्याला सोडणार नाही” अशी मर्दानी डरकाळी फोडलेले दिलीपराव एखादेच.
त्यांच्या याच धाडसी कामगिरीची नोंद बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली .त्यांना मातोश्री बोलावून घेत आशीर्वाद देऊन पेढा भरवत पूर्ण केली.
संकटात सापडलेल्यांना मदत करणं तसेच पिंपरीतील वाय सी एम रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो जणांवर मोफत उपचार व त्यांची सेवा करण्याची कामगिरी खांद्यावर घेतलेल्या दिलीप रावांना जनतेचे मिळालेले हेच प्रेम हीच त्यांच्या एकसष्ठी समारंभाची प्रचिती आहे.
