भव्यता आणि देसाई असे समीकरण असलेल्या आणि स्वप्नातील वास्तव जिवंत करण्याची किमया हातात असलेल्या नितीन देसाईंना पुण्यातील हॉटेल निसर्गचे जेवण अतिशय आवडायचे.
पुण्यात कामानिमित्त येणं झालं की, हमखास एरंडवणे येथील हॉटेल निसर्ग येथे ते येत असत. या हॉटेलचे मालक जवाहर चोरगे यांनी बातमी खासशी बोलताना, देसाईंच्या अनेक आठवणी यावेळी विषद केल्या. “त्यांना सी फूड अतिशय आवडायचे, राजकुमार संतोषी, अजय देवगण यांना तर ते बऱ्याचदा सोबत घेऊन यायचे. सर्वसामान्य ग्राहकाप्रमाणेच ते हॉटेलमध्ये बसत, कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट नको..असा त्यांचा आग्रह असे. कल्पनाशक्तीचा विस्तार नेहमी चांगल्या जेवणातून मार्गक्रमण करत असतो”.. असे एकदा ते म्हणाले होते अशी आठवण चोरगे यांनी सांगितली. दापोडी येथे वास्तव्यास असलेले आंतरराष्ट्रीय किर्तीचे चौघडा वादक दत्तोबा पाचंगे व रमेश पाचंगे यांना देसाईंनी दोन महिन्यांपूर्वीच आपल्या मुलीच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते. ‘प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत चौघडा वादन झाल्यानंतरच स्टेजवर होईल’ अशी संकल्पना देसाईंनी पाचंगे यांना सांगितली होती.
