( विजय जगताप)
राज्यशकट चालवण्यासाठी चाणाक्ष हुशार व खास मर्जीतले अधिकारी दिमतीला असले की सरकार स्पीडमध्ये पळते, अशी धारणा असल्याने पुन्हा सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे परदेशी नावाच्या अधिकाऱ्यांवर असलेले विशेष प्रेम आता स्पष्ट झाले आहे.
नव्याने सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असून आपल्या विभागात सचिव म्हणून डॉ श्रीकर परदेशी यांची त्यांनी निवड केली आहे. धाडसी, कर्तव्यदक्ष व जाईल तिथे आपल्या कामाचा ठसा उमटवलेल्या आयएएस अधिकार्यांमध्ये डॉ परदेशी यांचे नाव घेतले जाते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) अशी साडेचार वर्षे जबाबदारी सांभाळलेले अधिकारीही परदेशी नावाचेच होते. (प्रवीण परदेशी)
विशेष म्हणजे या दोन्ही परदेशींनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त म्हणून काम पाहिले असून शहरातील आपली कारकीर्द गाजवल्याचा इतिहास दोघांच्याही नावावर आहे. १९९७ मध्ये पिंपरी आयुक्तपदाची स्वीकारलेल्या प्रवीण परदेशी यांनी पुणे-मुंबई महामार्गाचे रुंदीकरण करण्याबरोबरच शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे यावर विशेष जोर दिला होता . त्यांच्या कामाचा धडाका शहरवासियांना प्रचंड भावला होता. प्रवीण परदेशी हे शासकीय सेवेतून नोव्हेंबर २०२१ मध्ये निवृत्त झाले असले तरी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी ते गोव्यातील हॉटेलमध्ये दिसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तसेच मागील गुरुवारी( ७ जुलै) सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीतही प्रवीण परदेशी सहभागी झाले होते.
दुसरे आयएएस डॉ श्रीकर परदेशी हे पिंपरीत आयुक्त झाल्यानंतर प्रशासनाची घडी बसविणे, अधिकाऱ्यांना सक्तीचा ड्रेसकोड, गळ्यात आयकार्ड व दर आठवड्याला एका अधिकाऱ्यांचा सन्मान अशी पद्धत त्यांनी रूढ केली होती. त्यांची कार्यशैली इतकी वेगवान होती की, शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्याचा त्यांनी असा काही सपाटा लावला होता की, संपूर्ण शहर त्यांना “बुलडोझर मॅन” म्हणू लागले होते. मात्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची ७ फेब्रुवारी २०१४ रोजी बदली करून नगरसेवकांच्या जीवात जीव आणून दिला होता. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयात कामाचा अनुभव असलेले डॉ परदेशी यांचा भारतातील टॉप टेन ब्रेन मध्ये समावेश होतो.
चांगल्या अधिकाऱ्यांची टीम सोबत असली की सरकार गतिमान करता येते, याची जाणीव असलेल्या मुरब्बी व चाणाक्ष उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रीकर परदेशी यांना आपल्या विभागात घेऊन शिंदे सरकार गतिमान करण्यासाठी सेकंड गिअर टाकला आहे.