तब्बल २५ वर्षे भाजपच्या ताब्यात असलेला मावळ दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने मिळविल्यानंतर आता तालुक्यावर मजबूत मांड ठोकण्यासाठी विकासकामांच्या धुराळयाचा जोरदार इव्हेंट करत आमदार शेळके यांनी एकाचवेळी आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून मावळवासियांचे डोळे दिपवून तर टाकलेच शिवाय भाजपचेही डोळे पांढरे करून टाकले.
नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार शेळके यांनी भव्य शक्तीप्रदर्शन करून आख्ख्या तालुकावासियांना अाश्चर्यचकीत करून विरोधकांची बोलती बंद केल्याची घटना घडली.
तब्बल दिड वर्ष कोरोनाकाळात गेल्याने या काळात नागरिकांशी संपर्क साधणे, जाहीर कार्यक्रम घेणे अशा सर्व गोष्टी जवळपास बंदच होत्या. परंतू मागील पंधरा दिवसांपासून राज्य शासनाने कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे पाहून निर्बंध खुले करत सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली आणि योगायोगाने आमदारांचा वाढदिवसही पाठोपाठ आल्याने संधीचा योग्य वापर करीत संपूर्ण तालुक्याचे वातावरण एकाच कार्यक्रमात आमदारांनी अक्षरश: ढवळून काढले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विशेष उपस्थिती, त्यांच्याच हस्ते प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या कामांचे लगेचच भूमीपूजन करण्याची आखलेली क्लृप्ती , राष्ट्रवादीचे फायरबॅ्रन्ड नेते अशी ओळख असलेल्या धनंजय मुंडे व निलेश लंके यांची उपस्थिती आणि तालुक्यातील शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत झालेला प्रवेश… असे एकाच दगडात दोन नव्हे तर पाच पक्षी मारण्याची कामगिरी या वाढदिवसाच्या माध्यमातून सफळ झाली.
कार्यक्रमाला झालेली प्रचंड गर्दी व निर्माण झालेल्या वातावरणामुळे कोणे एके काळी २५ वर्षे या तालुक्यावर भाजपचे राज्य होते हि आठवण पुसून टाकण्यात आमदार सुनिल अण्णा शेळके व त्यांच्या टिमला यश आल्याचे विरोधकही खाजगीत आता कबूल करू लागले आहेत.
राष्ट्रवादीलाही तालुक्यातील हा दिर्घ प्रयत्नानंतरचा विजय साजरा करण्याची संधी अामदारांच्या वाढदिवसातून लाभल्याने या संधीचे पक्षानेही सोने करून टाकत आगामी पंचायत समिती व नगरपरिषदांच्या निवडणूकांचा बार उडवून टाकला.
अवघ्या चार सहा महिन्यांवर आलेल्या या निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी अचूक टायमिंग साधलेला आमदारांचा हा वाढदिवस यापूर्वी झालेल्या त्यांच्या अनेक भव्य इव्हेंटच्या पंक्तीत आता जाऊन बसला आहे.