सत्कर्म ,पुण्यकर्म म्हणजेच वंचितांची व निराधारांची सेवा होय, यावर श्रध्दा असणा-या पिंपरी चिंचवडमधील ॲड लक्ष्मण रानवडे यांनी आज आपल्या आईच्या दशक्रिया विधीचे जेवण वृध्दाश्रमातील आजी आजोबांना समक्ष खाऊ घालून त्यांच्यासमवेत वेळ घालविल्याची घटना घडली.
मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष असलेले ॲड लक्ष्मण रानवडे हे या भागातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व. गेली ४० वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रानवडे परिवारावर मागील आठवडयात दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या आई सखुबाई रानवडे यांचे
वृध्दापकाळाने निधन झाले.स्वत: रानवडे तसेच त्यांच्या पत्नी, मुलगा, सुनबाई असे एकाच घरातील चौघेजण वकिली क्षेत्रात काम करतात.
आज ( मंगळवार २१ सप्टेंबर) आईच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम चिंचवडगावातील पवना घाटावर त्यांनी आयोजित केला होता. धार्मिक रितीरिवाज करणे तसेच चाकण येथील शशिकांत राऊत महाराज यांच्या प्रवचनाचा लाभ घेतल्यावर या कुटूंबाने मावळ तालुक्यातील कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमाची वाट धरली.
जिरा राईस, वरण, पु-या,लाडू, भाजी असे मिष्टान्न त्यांनी वृध्दाश्रमातील ११ आजी आजोबांना स्वत: वाढून भरविले.
‘कावळा तर सकाळी आईच्या नैवेदयाला शिवलाच पण आईच्या आत्म्याला खरा आनंद या सेवेतून लाभला ‘अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.