( विजय जगताप)
आपल्या वक्तव्यातून नेहमी स्वत:ला व आपल्या पक्षाला देखील डोक्याला हात लावायची पाळी आणलेल्या सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची अलिकडची कृती शहर भाजपला बॅकफूटवर घेऊन गेली आहे.
माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासारखी स्टाईल मारण्याच्या प्रयत्नात खासदार श्रीरंग बारणे यांना अंगावर घेण्याच्या प्रकार मात्र शनिवारी भाजपच्या अंगलट आला.
३० आॅगस्टला मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पवना धरण शंभर टक्के भरल्याबद्दल जलपुजन केले. वास्तविक ही कृती शास्त्रीय आधार व वैज्ञानिक नियमाची नसली तरी हा भावनेचा तसेच श्रध्देचा भाग असल्याने कोणाची त्यास दरवर्षीप्रमाणे काहीच हरकत नव्हती.
मात्र मागील दोन वर्षात भाजप व सेनेत ताणल्या गेलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर बारणेंना घेरण्याची संधी पक्षनेते असलेल्या ढाके यांनी साधली व जलपुजनाचा अधिकार महापौरांचा असल्याचा शोध लावला.
महापौरांच्या वतीनेही लगेच शनिवारी ( ता.४) पवना धरण जलपुजनाचा निर्णय घेण्यात आला.मात्र मावळ तालुक्यात पिंपरी चिंचवडपेक्षा ब-यापैकी चांगलं संघटन व ताकद असलेल्या शिवसेनेने रातोरात तयारी करून महापौरांना जलपुजन करू द्यायचे नाही व पवना धरणग्रस्तांचे प्रश्न अजून कायम असल्याचा जुनाच परंतू सत्य मसाला बाहेर काढत निषेध करण्याचा निर्णय घेतला.
महापौर या पदाची व पक्षाची शोभा जायला नको असा विचार करत अखेर महापौरांनी आपल्या शेड्युलमधून या कार्यक्रमाला कल्टी मारली.
बारणेंना ललकारणे व चिथवण्याचे प्रकार यापूर्वी कारभारी आमदार लक्ष्मण जगताप यांना खुश करण्यासाठी एकनाथ पवार नेहमी करत.भाजप – सेनेत तेव्हा नेहमी भिडाभिडी व्हायची.
तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न नामदेव ढाके यांनी केला खरा मात्र तो पक्षाच्या अंगलट आला. वास्तविक नैसर्गिक न्याय तत्वानुसार ढाकेंचे म्हणणे योग्यच होतं.परंतू त्यांना साथ द्यायला कोणीच पुढे आले नाही.सध्या साडेसातीच्या चक्रात शहर भाजप अडकल्याने एकाचवेळी एकीकडे राष्ट्रवादी तर दुसरीकडे शिवसेनेबरोबर लढायला सध्या तरी भाजपमध्ये अवसान नसल्याची स्थिती आहे.
या संदर्भात भाजपच्या चाणक्य समजल्या जाणा-या शहर पदाधिका-याला छेडले असता, ‘खासदार बारणेंना ‘करारा जवाब’ लवकरच आम्ही त्यांच्या शहरातूनच देणार आहोत’असे उत्तर त्यांनी दिले.