कोरोनाचे संकट आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने आरक्षण प्रश्नी उद्विग्न न होता संयमाने संघर्ष चालूच ठेवावा ,असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर डुबल यांनी आज येथे केले .
मराठा सेवा संघाच्या ३१व्या वर्धापनदिना निमित्त संत तुकाराम नगर , पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय मार्गदर्शक विजयकुमार ठुबे , संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव , माजी महापौर योगेश बहल संघाच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ . मोहन पवार , जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुनीता शिंदे , शहर अध्यक्ष स्मिता म्हसकर , वधुवर कक्षाचे अध्यक्ष गोविंद खामकर , ज्येष्ठ नागरिक कक्षाचे अध्यक्ष मोहन जगताप , संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम , मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे या वेळी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची असून घटना दुरुस्ती करून केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवून दयावी ‘अशी मागणी डुबल यांनी या वेळी केली . तर ‘मराठा सेवा संघाने अंधश्रद्धा व कर्मकांडात अडकलेल्या समाजाला नवीन दिशा दयावी असे म्हणत मराठा सेवा संघाच्या शाखा देशभरातील विविध राज्यात सुद्धा कार्यरत असल्याचे राष्ट्रीय मार्गदर्शक विजय कुमार ठुबे यांनी या वेळेस म्हटले .
यावेळी विठ्ठलराव गायकवाड , सुरेश इंगळे , आदींनी शुभेच्छा पर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजक व मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार यांनी आभार मानले.