थेरगाव येथील अंगणवाडीत काम करणा-या माधुरी शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आंदर मावळातील सहारा वृध्दाश्रमास तीन हजार रूपयांची मदत केली.
मावळ तालुक्यात कुसवली येथे अनाथ-निराधारांसाठी सहारा वृध्दाश्रमाची उभारणी सहारा सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. फुटपाथ,रेल्वे प्लॅटफाॅर्म तसेच बसस्टाॅपवर जीवन व्यतीत करणा-या निराधार आजी आजोबांचा सांभाळ करण्याच्या कामास संस्थेच्या वतीने प्रारंभ करण्यात आला आहे.
या वृध्दाश्रमाच्या कार्यास बळकटी व उत्तेजन देण्यासाठी माधुरी शिंदे यांनी खारीच्या वाटा स्वरूपात मदत करण्याचा निर्णय घेतला. त्या दरवर्षी आपल्या वाढदिवसाला अनाथालय, मतिमंद शाळा, तसेच गरीब मुलामुलींना मदत करण्याचे काम करतात.
यंदा त्यांनी सहारा वृध्दाश्रमास मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष विजय जगताप यांच्याकडे त्यांनी आपल्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला.माधुरी शिंदे यांचे पती मधुकर शिंदे, त्यांच्या दोन कन्या मयुरी व प्रतिक्षा यांच्यासह समाज प्रबोधनकार शारदाताई मुंढे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.