( विजय जगताप )
सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अमेरिकेतील ख्यातनाम शिक्षण संस्थेकडून डाॅक्टरेट पदवीचा सन्मान नुकताच पिंपरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांना प्रदान करण्यात आला.
अत्यंत मानाची व प्रतिष्ठेची समजली जाणारी ही पदवी असून असा सन्मान मिळालेल्या त्या महापालिकेच्या पहिल्या नगरसेविका ठरल्या आहेत.तसेच या पुरस्कारामुळे शहराच्या नावलौकिकातही भर पडली आहे. नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड या संस्थेकडून द अमेरिकन युनिव्हर्सिटी युएसए ( USA)यांची मानाची ‘डॉक्टर ऑफ सोशल सायन्स’ ही पदवी त्यांना मिळाली आहे.
पंतप्रधान पब्लिक वेल्फेअर स्कीम इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद मोदी यांच्या हस्ते व ज्येष्ठ वैज्ञानिक डाॅ मधु कृष्णन यांच्या उपस्थितीत त्यांना या पदवीने गौरविण्यात आले.
सुलक्षणा धर-शिलवंत या अशोक सर्वांगीण विकास सोसायटी या सामाजिक संस्थेच्या कार्याध्यक्षा म्हणून १९९६ पासून जबाबदारी सांभाळतात. सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक व मानवतावादी धार्मिक कार्य प्रामुख्याने या संस्थेमार्फत केले जाते.देशाच्या विविध भागात उभारण्यात आलेले ‘अशोक स्तंभ’ हे या संस्थेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेले व नोंदविलेले विशेष कार्य म्हणून ओळखले जाते.
सुलक्षणा धर यांचे वडील दिवंगत अशोक शिलवंत यांनी पाया रचलेल्या या सामाजिक संस्थेची धुरा त्या आज समर्थपणे सांभाळत आहे.त्याचबरोबर अशोक सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्या काम पाहतात.२०१९ मध्ये त्या नगरसेविका म्हणून महापालिका निवडणूकीत निवडून आल्या. यावेळी प्रसिद्ध हाॅकीपटू धनराज पिल्ले,पार्श्वगायक कुमार सानू,ख्यातनाम वकील उज्वल निकम यांना देखील हा अवॉर्ड प्राप्त झाला आहे.