भिकेचा संबंध भूकेशी असल्याने लाॅकडाऊन काळात शहरातील भिक्षेक-यांचे होत असलेले हाल पाहून शहरातील काही युवक एकत्र आले आणि ‘माणूसकीचा घास’या सर्वांना भरविण्यास सुरूवात झाली.
९ मे पासून सुरू झालेल्या माणुसकीच्या या घासाची चळवळ आता शहरातील शेकडो नागरिकांच्या आर्थिक सहकार्यावर मोठी झेप घेऊ लागला आहे.
निगडी प्राधिकरणात भागात राहणारे व एकत्र क्रिकेट खेळणारे हे सारे युवक डाॅ विनयकुमार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आणि हा मित्र परिवार वाढत गेला.लाॅकडाऊनमुळे सगळेच संकटात असताना शहरातील भिक्षेकरी आपली भूक कशी भागवित असतील या विचाराने डाॅ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे सारे एकत्र आले . सर्वांनी आपल्याला जमेल व झेपेल एवढी रक्कम गोळा केली व लोकांना आवाहनही केले पाहता पाहता शंभर रूपयापासून पाच हजारापर्यंत मदत गोळा होत गेली व रकमेचा आकडा दिड दोन लाखा पर्यंत गेला.पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, आकुर्डी, पिंपरी, भोसरी या मुख्य चौकासह भिक्षेकरी जेथे जेथे असतील त्या ठिकाणी दोन वेळचे अन्न पोहोचविण्यास सुरूवात झाली.दोन चपाती, भाजी, वरण भात व पाण्याची बाटली असा मेनू पॅकबंद प्लेटमधून शहरातील सा-या भिक्षेक-यांना आता मिळू लागला आहे.
या उपक्रमात निवेदक अक्षय मोरे,पराग इंगळे,विशाल जगताप,जितेंद्र कासट,विनायक भोळे,माऊली खराडे,गणेश बेंद्रे,अभिजित पवार, राहुल बाविस्कर,डाॅ दर्शन हिरेमठ, ऋषिकेश जावेरी,जगदीश पवार यांची साथ व सहकार्य मिळत आहे.
शहरातील प्रबोधनकार शारदाताई मुंढे यांनी आज या युवकांच्या कार्यास भेट देऊन कौतूक केले.