( विजय जगताप )
दोनच दिवसांपूर्वी पिंपरीतील आमदारांच्या कार्यालय परिसरात गोळीबाराचा प्रकार घडला आणि “ मी सुरक्षित आहे, मला काहीच झालेले नाही, काळजी करू नका ” असे त्याक्षणी जनतेला सांगणारे आमदारच नंतर काळजीत पडल्याची घटना उजेडात आली.
राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर गोळीबार होतो ही नक्कीच धक्कादायक बाब असल्याची प्रतिक्रिया नोंदविणा-यांना जेव्हा या घटनेमागची घटना समजली तेव्हा सहानभूतीचे रूपांतर अखेर संतापात झाले.
मुख्य घटनेच्या आदल्या दिवशी आमदारपुत्र सिध्दार्थ बनसोडे व सहका-यांनी एका ठेकेदाराच्या कार्यालयावर राडा घालणे त्याचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होणे, पाठोपाठ आमदारांनी शिवीगाळ केलेली व आमदारांच्या एका कार्यकर्त्याने अर्वाच्च शिवीगाळ केलेली अशा दोन आॅडिओ क्लिप व्हायरल होणे यामुळे जनतेला व्हायचा तो उलगडा झाला.
एरव्ही शहरातील सत्ताधा-यांच्या कारभारावर तुटून पडणा-या शहर राष्ट्रवादीला जेव्हा आपल्याच आमदाराची ‘ रसाळ वाणी ’
सोशल मिडियात तुफान माजवत फिरते आहे हे कळाल्यानंतर अज्ञातवासात जायची पाळी आली.
लोकप्रतिनिधींनी कसे वागले नाही पाहिजे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या राडेबाजीकडे बोट दाखविता येईल. आपण कोणीतरी ‘ विशेष ‘ आहोत या भ्रमात व समजूतीत बहुसंख्य राजकारणी असतात. समाज त्यांच्या ब-या वाईट अशा सा-या गोष्टींचे निरीक्षण करत असतो याचे भान व शुध्द अनेकदा पुढा-यांना रहात नाही.
सरकारी अधिकारी, कर्मचारी आपल्यापुढे वाकतात, समाजात जिकडे तिकडे मान सन्मान मिळतो, आपल्या शब्दाला डावलले जात नाही अशी खात्री झाली की प्रत्येक वाक्यावाक्यात नकळत यांचा अहंकार डोकावू लागतो. परवाच्या घटनेतील गोळीबार करणारा आरोपी तानाजी पवार दोन्ही आॅडिओ क्लिपमध्ये न घाबरता व समोरून शिव्यांची बरसात होत असतानाही संवादाने प्रत्युत्तर देत होते.राज्य राखीव पोलीस दलातील माजी कर्मचारी असल्याने साहजिकच या मंडळीच्या वागण्या बोलण्यात एक निडरपणा आलेला असतो. त्यामुळेच आमदार व त्यांच्या बगलबच्च्यांचा तिळपापड झाला आणि ही घटना जन्माला आली.
आमदार बनसोडे यांनी मिडियाला सांगितल्याप्रमाणे महापालिकेच्या स्वच्छता व कचरा वाहतूकीच्या ठेकेदाराने आपली दोन माणसे कामाला घ्यावीत हा आमदारांचा आग्रह होता व वादाला तेच निमित्त झाले.
आमदार व त्यांच्या पीएला समोरून फारसे महत्त्व न दिले गेल्यामुळे व टाळाटाळ झाल्याने आमदारांचा यात अवमान झाला, कार्यकर्ते संतापले आणि पुढचा प्रकार घडला.
मितभाषी असलेले व कधीच प्रसिध्दीच्या सोंगाढोंगात न अडकण्याचा स्वभाव असलेले आमदार बनसोडे यांचे राजकारण व काम करण्याची पध्दत थोडी हटके स्टाईलची म्हणून ओळखली जाते. निवडून येण्यासाठी ‘ फाॅर्म्युला ’ लागत असतो व त्यामध्ये त्यांनी प्राविण्य मिळविलेले आहे. साहित्य, संगीत व सांस्कृतिक जाण व समज नसलेला त्यांचा दरबार असतो. अशा ठिकाणी कोण कुठला ठेकेदार व त्याची माणसं आपलं ऐकत नाही याचा राग आमदारांना आला.आणि होऊ नये तो प्रताप घडला.
यामुळे आपली प्रतिमा व उंची वाढण्याऐवजी ती कमी झाल्याची भावना आमदारांना व राष्ट्रवादी पक्षाला झाली आहे. तीन दिवस लोटूनही आमदारांच्या बाजूने तर नाहीच व विरोधातही कोण बोलायला तयार नाही यातच सर्व काही आले आहे.